ठाणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। सफाई कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावत असताना जैववैद्यकीय कचऱ्याच्या (बायोमेडिकल वेस्ट) संपर्कात येऊन काही इजा झाल्यास या सफाई मित्रांना हेपाटायटिस बीची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व सफाई मित्रांसाठी हेपेटायटिस बी लसीकरणाची मोहिम ठाणे महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि गुरुकृपा फाऊंडेशन यांनी हाती घेतली आहे.
स्वच्छता ही सेवा उपक्रमात सफाई मित्रांच्या लसीकरण मोहिमेचा आरंभ वर्तकनगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आला. या कार्यक्रमास, उपायुक्त मनीष जोशी आणि दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, वर्तक नगरचे सहाय्यक आयुक्त विजय कावळे, गुरुकृपा फाउंडेशनच्या वतीने डॉ. किरण पंडित आणि डॉ. ज्योती आव्हाड आदी उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सीएसआरच्या माध्यमातून गुरुकृपा फाउंडेशन यांच्यासोबत एकत्र येऊन महापालिकेच्या सेवेतील नियमित तसेच, सर्व कंत्राटी सफाई कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात येत आहे. पहिल्या लसीकरण सत्रात एकूण ७० सफाई कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. टप्पाटप्याने सुमारे ४५०० कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याचे उपायुक्त मनीष जोशी यांनी स्पष्ट केले.
लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या लसीची जुळवणी करण्यात आली. आहे. हेपटायटिस बी लस ही पहिला डोस, एक महिन्याने दुसरा डोस आणि सहा महिन्यांनी तिसरा डोस अशी देण्यात येते. स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत हेपेटाइटिस बी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग समितीनिहाय ठिकाणे निश्चिती करून ठराविक वेळापत्रकाप्रमाणे हे लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर