अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.)
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी अखिल भारतीय संत्रा परिषदेच्या माध्यमातून संत्रा परिषदेचे आयोजन करून केंद्र व राज्य शासनाचे धोरण, पायाभूत सुविधा, संत्रा प्रक्रिया उद्योग, सत्राचे भावला संरक्षण, बाजारपेठ व निर्यात धोरण, अतिरिष्टीमुळे व विविध रोगांमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, संत्रा व्यवस्थापन, शीतगृहे, यासह विविध विषयावर मंथन करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मातोश्री विमलताई देशमुख सभागृह अमरावती येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा आयोजित अखिल भारतीय संत्रा परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी येथे अखिल भारतीय संत्रा परिषदेची पूर्वतयारी बैठक शेकडो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
विदर्भाचा फळाचा राजा संत्रा आंबड, गोळ, अविट चवीचे आरोग्य वर्धक फळ विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडविणारे ठरले. शेतकरी आत्महत्यांकरीता प्रसिध्द असलेल्या अमरावती विभागात, 'संत्रा उत्पादक' शेतकरी पुर्वी आत्महत्या करीत नव्हता. नजिकच्या काळात राजकीय, शासकिय, प्रशासकिय आणि संघटनात्मक अपयशामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आत्महत्या करायला लागला आहे हि धोक्याची घंटा आहे. संत्रा वाचविला पाहिजे, उत्पादक शेतकरी वाचविला पाहीजे. वेळीच उपाय योजना करण्यासाठी, संघर्ष करणे परिस्थितीची गरज आहे. संत्रा उत्पादकांना दर्जेदार रोग मुक्त कलम, बागेचे नियोजन बध्द संगोपन, बागेचे पोषक तत्व व्यवस्थापन, उत्कृष्ट फळ उत्पादन व खात्रीची बाजारपेठ (देशांतर्गत / आंतरराष्ट्रीय) या प्रमुख गरजा पुर्ण करण्यासाठी पायाभुत सुविधा, संशोधित मार्गदर्शन, रचनात्मक संघटन यांची आवश्यकता असल्यामुळे संत्रा उत्पादक परिषद २०२५ च्या माध्यमांतुन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याचा महाराष्ट्र राज्य किसान सभा आयोजित अखिल भारतीय संत्रा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करीत असून मोठ्या बदलाचे दिशेने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी, हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा परिषदेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे महासचिव अशोक सोनारकर यांनी केले.
यावेळी संत्रा उत्पादक परिषदेमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील आव्हाने आणि त्यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात चर्चा व संवाद करून विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून मोर्शी तालुक्यातून हजारो संत्रा उत्पादक शेतकरी अमरावती येथे होणाऱ्या संत्रा उत्पादक परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी पूर्वतयारी बैठकीला स्वागत समितीचे अध्यक्ष साहेबराव विधळे, सचिव अशोक सोनलकर, संजय मंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप रोडे, युवा उद्योजक नवीन पेठे, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रुपेश वाळके, प्रमोद दंडाळे, राजेंद्र घारड, गोपाल डहाके, रविकांत पाटील, बबनराव गांगडे, अश्विनी वानखडे, महादेव मानकर, संजय सुने, प्रशांत कांडलकर, अजय दातीर, श्याम वानखडे, संजय ठोके, गजानन चोपडे, सुधीर राऊत, यांच्यासह आदी संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी