अमरावती, 4 ऑक्टोबर, (हिं.स.) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगराचा श्री विजयादशमी उत्सव रविवार दि. 05 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी किरण नगर येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
हिंदू समाजातील पुरुषार्थ तथा शक्ती व पराक्रमाचा जागर विजयादशमी उत्सवात होत असतो. यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पुर्ण होत आहेत. विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी स्वयंसेवक मागील अनेक दिवसांपासून तयारी करत आहेत.
यंदाच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून विपश्यना आचार्य डॉ. कमलताई गवई (आईसाहेब) संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती यांना सादर निमंत्रित केले आहे. आणि या उत्सवाला प्रमुख वक्ते म्हणून अ. भा. संयोजक प्रज्ञा प्रवाह , अ. भा. कार्यकारिणी सदस्य रा. स्व. संघ व जेष्ठ विचारवंत श्री. जे नंदकुमारजी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी उत्सवात दंड, नि:युद्ध , व्यायाम योग व घोषाचे प्रात्यक्षिक होणार आहे. उत्सवा पूर्वी सायं ५.०० वाजता पथसंचलन नरसम्मा महाविद्यालय येथून सुरू होऊन फरशी स्टॉप, कवर नगर, सबनीस प्लॉट मोतीनगर चौक किरण नगर - साई मंदिर मार्गे जाणार आहे.
या कार्यक्रमाला अमरावतीकर नागरिकांनी सहपरिवार, इष्टमित्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर संघचालक श्री. उल्हासजी बपोरीकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी