परभणी महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे कर्मचारी वर्ग संतप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत संवर्ग अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे शासन, पालक मं
धरणे आंदोलनाची चेतावणी


परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे कर्मचारी वर्ग संतप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत संवर्ग अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे शासन, पालक मंत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

संघटनेने दि. ६ ऑक्टोबरपासून प्रस्तावित असलेले आंदोलन रद्द करून आता दि. ८ ऑक्टोबर २०२५ पासून परभणी शहर महानगरपालिका कार्यालयासमोर कामबंद धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महापालिकेला पगारासाठी शासनाकडून मिळणारे सहाय्यक अनुदान अपुरे असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होऊ शकत नाहीत. या संदर्भात मनपेकडून शासनाकडे वाढीव अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असला तरी, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

संघटनेने आरोप केला आहे की, मनपा प्रशासनात मनमानी कारभार सुरू असून काही कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर पदोन्नती देण्यात आली आहे, तर अनेकजण २० वर्षांहून अधिक काळ सेवा करूनही पदोन्नतीपासून वंचित आहेत. यामुळे वरिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

निवेदनावर के. के. आंधळे (संस्थापक अध्यक्ष), नासेर खान, के. के. भारसाखळे, विशाल उफाडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande