पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
कुख्यात गुंड नीलेश घायवळने त्याच्या आडनावात ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असा बदल करीत पोलिस आणि पासपोर्ट विभागाला चकवा देऊन तो स्वित्झर्लंडला पसार झाला. त्याने पासपोर्ट कार्यालयात त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे खोटे शपथपत्र दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पुणे पोलिसांच्या पथकाने गुरुवारी नीलेश घायवळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घरी छापा टाकून झडती घेतली. त्याने पासपोर्ट काढताना पुण्यातील कोथरूडऐवजी अहिल्यानगरमधील पत्ता दिला होता. अहिल्यानगर पोलिसांनी त्याच्या पत्त्यावर कोणी आढळले नाही.तसेच, ‘सीसीटीएनएस’ यंत्रणेत गायवळ नावाच्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे पोलिस पडताळणीच्या अर्जातील संबंधित रकान्यात गुन्हा दाखल नाही, असा शेरा लिहिला होता.घायवळने तत्काळ पासपोर्टसाठी २३ डिसेंबर २०१९ रोजी अर्ज केला होता. त्याला दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ डिसेंबर रोजी पासपोर्ट देण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांना ज्या पत्त्यावर कोणी आढळले नव्हते. त्याच जामखेड येथील पत्त्यावर टपाल विभागाकडून पासपोर्ट पोच झाल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु