सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील एक रिक्षा, दुचाकी व 23 मोबाईल हस्तगत केले. दोन गुन्हेगारांना पकडण्यात आले.शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, चोरीची अॅटो रिक्षा विकण्यासाठी एक इसम अक्कलकोट रोडवर येत आहे. त्यानुसार महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड रस्त्यावर सैफन नुरुद्दीन बागवान (वय 30, रा. किसान नगर, सोलापूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक अॅटो रिक्षा व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. यामध्ये दोन गुन्हे उघडकीस आले. पोलिसांची गस्त सुरू असताना लखन तुकाराम बेरुणगी (वय 38, रा. राहुल गांधी झोपडपट्टी, दाजी पेठ, सोलापूर) हा त्याच्या हातामध्ये पांढर्या रंगाच्या पिशवीमध्ये काहीतरी घेऊन जात असताना मिळून आला. त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये विविध कंपनीचे 23 स्मार्ट मोबाईल फोन मिळून आले. त्यातील एक मोबाईलचा गुन्हा सापडला. उर्वरित 22 मोबाईलच्या नंबरची पडताळणी करून मोबाईलधारकांचा शोध सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड