सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
राज्यात यापूर्वी अनुकंपा भरती मध्ये खूप अडचणी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने अनुकंपाच्या सर्व अडचणी दूर करून एकच नवीन शासन निर्णय काढला, त्यानुसार संपूर्ण राज्यभरात अनुकंपाचे 5 हजार 187 तर एमपीएससीद्वारा निवडलेले लिपिक 5 हजार 122 असे एकूण दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना एकाच वेळी व्यक्ती आदेश देण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात होत आहे. सोलापूर जिल्ह्यात आज अनुकंपा ड वर्ग 60 व क वर्ग 50 तसेच राज्य लोकसेवा आयोगाद्वारा नियुक्त 96 असे एकूण 206 उमेदवार यांना नियुक्ती आदेश देऊन शासन सेवेत रुजू केले जात आहे. तरी या सर्व उमेदवारांसाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण असून त्यांनी आपल्या मातीची सेवा करण्याबरोबरच राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले मनापासून योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात येणाऱ्या व महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून शिफारस केलेल्या नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण प्रसंगी पालकमंत्री श्री. गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख तसेच अनुकंपा व लिपिक वर्गीय कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, आज भरती होणाऱ्या सर्व उमेदवारांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा हा दिवस आहे. आज पासून आपण शासकीय सेवेत रुजू होणार असल्याने आपण आपली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी. आपल्या मातीची सेवा मनापासून करावी. शासन सर्व अनुकंपा कुटुंबासोबत सदैव असून अनुकंपा भरती ही शासनाची खूप मोठी जबाबदारी होती व शासन ती जबाबदारी पार पाडत आहे. अनुकंपा मधील उमेदवारांना न्याय देण्यासाठी शासनाने कायदा बदलला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात अनुकंपा भरतीच्या 110 उमेदवारांचे निवडीकरचा जिल्हा प्रशासनाने मागील चार महिन्यापासून अत्यंत नियोजनबद्ध व पारदर्शकपणे काम केलेले आहे त्यात जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व टीमचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले. तसेच नवीन भरती होणाऱ्या सर्व 206 उमेदवारांना त्यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आजपासून शासन सेवेत रुजू होणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासकीय सेवेत दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. यातून जनसेवा करण्याची मोठी संधी आपल्याला लागणार असून आपण त्यात यशस्वी व्हावे असेही त्यांनी आवाहन केले. तर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रशासकीय सेवा व लोकसेवा तशा पहिल्या तर एकच असून पण त्यात मूलभूत फरक आहे. आपण आज शासकीय सेवेत रुजू होत आहेत. तरुणांनी लोकसेवा करण्याचे ध्येय बाळगावे असे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी अनुकंपा भरती साठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामकाजाची माहिती देऊन या अंतर्गत ड वर्ग 60 तर क वर्ग 50 कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात येत असून ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडल्याचे सांगितले तसेच एमपीसी कडून लिपिक वर्गीय 96 कर्मचारी जिल्ह्याला मिळाले असून त्या सर्वांची नियुक्ती आज पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आदेश वितरित करून 26 विभागाअंतर्गत केली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
मुंबई येथील मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्हास्तरीय कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटी आभार जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार दिनेश पारघे, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांच्यासह महसूल विभागातील अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड