लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर मनपा आयुक्त मानसी यांनी शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन सुरू असलेले कामांची व नवीन योजनांची पाहणी केली. नागरिकांच्या सूचना ऐकून घेतल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, हुतात्मा स्मारक व स्विमिंग पूलची पाहणी करून आर्वी गायरान येथील स्मशानभूमी परिसर व नाल्या संदर्भातील तक्रारीही ऐकून घेतल्या.
श्रीमती मानसी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पाहणी केली. हे उद्यान अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करावे. उद्यानात लॉन विकसित करून लहान मुलांसाठी खेळणी तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे व कट्टे तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हुतात्मा स्मारक येथेही आयुक्तांनी भेट दिली. परिसर विकसित करून येथेही वृद्धांसाठी बैठक व्यवस्था तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले. हुतात्मा स्मारकाच्या बाजूसच मनपाचा स्विमिंग पूल आहे.गेल्या अनेक वर्षांपासून बंद असणारा हा स्विमिंग पूल विकसित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
आर्वी गायरान येथील नागरिकांच्या काही तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने आयुक्त श्रीमती मानसी यांनी तेथेही भेट दिली. स्मशानभूमी संदर्भातील तक्रारी ऐकून घेतल्या. या स्मशानभूमीच्या विकासासाठी प्रस्ताव देण्यात आलेला असल्याचे आयुक्तांनी नागरिकांना सांगितले.आर्वी परिसरातून एक मोठा नाला वाहतो. हा नाला ओलांडण्यासाठी असणारा पूल कमी उंचीचा आहे. या ठिकाणी नवा पूल बांधण्याचीही मागणी नागरिकांनी केली. या पुलासाठीही प्रस्ताव दाखल केलेला असल्याचे आयुक्त श्रीमती मानसी यांनी नागरिकांना सांगितले.
आयुक्तांसमवेत उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, शहर अभियंता उषा काकडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक कलीम शेख, ,उद्यान विभाग प्रमुख समाधान सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis