पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी आता ‘स्वीफ्ट चॅट’ या ॲप्लिकेशनवर नोंदविण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.त्यानुसार, ऑक्टोबरपासूनच या ॲपवर मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शालार्थ आयडी आणि युडायस कोड याद्वारे लॉगिन करून विद्यार्थ्यांची हजेरी ‘स्मार्ट’ पद्धतीने नोंदवावी, असा आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे.
राज्यात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ‘स्वीफ्ट चॅट’ या ॲपमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ या ‘बोट’द्वारे ऑनलाइन नोंदविण्याचे आदेश डिसेंबर २०२३ मध्ये दिले आहेत. आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक शाळांनी याद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली आहे. परंतु सद्यःस्थितीत राज्यातील केवळ दोन ते अडीच हजार शाळाच नियमितपणे विद्यार्थ्यांची हजेरी या ॲपद्वारे नोंदवत असल्याची माहिती समोर आली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा आदेश दिला आहे.वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार आदेश देऊनही जिल्हा स्तरावरही क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात अनियमितता दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु