ठाण्यात ७ ऑक्टोबरला ‘अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा’
ठाणे, 4 ऑक्टोबर, (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ०३ ते ०९ ऑक्टोबर दरम्यान राज्यभर ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ठाणे येथे मंगळवारी, ०७ ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा’ आयोजित करण
ठाण्यात ७ ऑक्टोबरला ‘अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा’


ठाणे, 4 ऑक्टोबर, (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ०३ ते ०९ ऑक्टोबर दरम्यान राज्यभर ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ठाणे येथे मंगळवारी, ०७ ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या सोहळ्यात मराठी भाषेसंदर्भात समर्पित वृत्तीने कार्यरत राहिलेल्या व्यक्तींचा सत्कार, तसेच मराठी भाषेचा जागर करणाऱ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव, अभिमान आणि वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ०३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून राज्य शासनाकडून साजरा करण्यात आला. त्याचबरोबर शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ०३ ऑक्टोबर ते ०९ ऑक्टोबर हा सप्ताह ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ०५ वाजता राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे ‘अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा’ संपन्न होणार आहे. या सोहळ्याबाबत शनिवारी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, मराठी भाषा विभागाचे संचालक डॉ. शामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील यांच्यासह मराठी भाषा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने ठाण्यात ०७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्या’त मराठी भाषेच्या प्रसार आणि विकासासाठी सक्रिय योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. यात भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी वरिष्ठ अधिकारी तथा साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, ज्येष्ठ लेखक प्राचार्य अशोक चिटणीस, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, मराठी संशोधन मंडळाचे माजी अध्यक्ष व लेखक डॉ. प्रदीप कर्णिक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मराठी भाषेची थोरवी सांगणारे कार्यक्रमही या सोहळ्यात होणार आहेत, अशी माहिती प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात साहित्य, कला, संगीत, क्रीडा, शिक्षण आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांकरिता खुला असून ठाणेकर नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande