अमरावती, 5 ऑक्टोबर (हिं.स.)शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अट्टल चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी पकडली आहे. या टोळीने गत दोन वर्षांत शहरात तब्बल २७ घरफोडीचे गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासताच समोर आले आहे. यामध्ये एका न्यायाधिशांचेही घर त्यांनी फोडले होते. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल १३ लाख ३० हजारांच्या सोन्यासह २१ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
अमोल गोकुळ पाटील (३२), सागर लक्ष्मण देवरे (३०, दोघेही रा. मोहाडी जि. जळगाव), निखिल उर्फ पिस्तूल कैलास पाटील (२४, रा. मांडळ जि. जळगाव) आणि मिलिंद संजय खैरनार (२९, रा. जोळवा, जि. सुरत, गुजरात) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. ९ सप्टेंबरला शहरातील कॅम्प परिसरात राहणाऱ्या एका महिला न्यायाधीशांचा बंद फ्लॅट दिवसाढवळ्या फोडून चोरट्यांनी तब्बल नऊ लाख रुपयांचा ऐवजावर हात साफ केला होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये या टोळीचा हात असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याना अटक करुन २७ गुन्हे उघड केले आहे.
या चोरट्यांकडून १३.३० लाखांचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी जप्त केली. या टोळीमध्ये दोन ते तीन सदस्य जुने असतात व एक ते दोघे प्रत्येक ठिकाणी नवे असतात. अमरावतीत चोरीसाठी आलेल्या टोळीत ४ जुने व एक नवा सदस्य होता. टोळीतील जुन्यांनी मोबाइलचा वापर करायचा नाही ठे ठरवले आहे. त्यामुळे ते गुन्हा प्रक्रियेत मोबाईल वापरत नाहीत. मात्र अमरावतीत नव्या टोळी सदस्याने दोन मिनिटांसाठी मोबाईल सुरू केला आणि दोन मिनीटात बंद केला. त्या दोन मिनीटात त्याला एक ‘एसएमएस’ प्राप्त झाला. त्या एका एसएमएसच्या मदतीने गुन्हे शाखेने अख्खी टोळी ट्रॅप केली. कारण हा ‘एसएमएस’ ज्या चोरट्याच्या मोबाइलवर पडला होता. त्याचा मोबाईल आठ तासांपूर्वी जळगावात बंद झाला, त्यानंतर ८ तासाने अमरावतीत दोन मिनिटांसाठी सुरू झाला, त्यानंतर पुन्हा बंद मोबाईल आठ तासाने जळगावात सुरू झाला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला व त्याला तांत्रिक तपासाद्वारे ताब्यात घेवून उर्वरित टोळी सदस्यांना पकडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी