टोकियो, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।जपानमध्ये शनिवारी रात्री जोरदार भूकंपाचा धक्का जाणवला.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.0 इतकी नोंदवली गेली. हा भूकंप शनिवारी (४ ऑक्टोबर) रात्री होंशू बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर आला. धक्के इतके तीव्र होते की आजूबाजूच्या इमारतीही थरथरू लागल्या.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रा (एनसीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या 50 किलोमीटर खोलीत होते. अशा खोलीत येणारे भूकंप सहसा मध्यम ते तीव्र श्रेणीत येतात. भूकंपाचे केंद्र होंशू बेटाच्या पूर्वेकडील समुद्रात होते. त्यामुळे या भूकंपाचे धक्के विशेषतः तटीय भागांमध्ये तीव्रतेने जाणवले. ज्यात फुकुशिमा, मियागी आणि इवाते प्रांत मुख्य होते.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाचे धक्के काही सेकंदांपर्यंत जाणवत होते, ज्यामुळे लोक घरं आणि इमारतींमधून बाहेर येऊन मोकळ्या जागांमध्ये धावून गेले.सध्या तरी कोणतीही मोठी जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
जपानच्या हवामान विभागाने (जेएमए ) आणि पॅसिफिक सूनामी वॉर्निंग सेंटरने पुष्टी केली आहे की या भूकंपानंतर सूनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. भूकंपाचे केंद्र समुद्राखाली असले तरी ते 50 किमी खोलीवर असल्यामुळे सूनामीची शक्यता कमी मानली जात आहे.
जपान हा भूकंप पट्ट्यात येतो, जिथे टेक्टॉनिक प्लेट्स सतत हालचाल करत असतात. या भागात छोटे आणि मध्यम तीव्रतेचे भूकंप वारंवार येत असतात, तर मोठे भूकंप क्वचितच पण मोठ्या प्रमाणावर विध्वंस करणारे असतात. तज्ज्ञांच्या मते, जपानमध्ये इमारती, पूल आणि पायाभूत सुविधा उच्च भूकंपीय मानकांनुसार बांधल्या गेल्या आहेत, ज्यामुळे भूकंपाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode