भारतीय वंशाच्या हरजस सिंगची विक्रमी 314 धावांची खेळी
कॅनबेरा, 5 ऑक्टोबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये भारतीय वंशाचा तरुण फलंदाज हरजस सिंगने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली. सिडनी क्रिकेट क्लबविरुद्ध वेस्टर्न सबर्ब्सकडून खेळताना हरजसने केवळ १४१ चेंडूत ३५ षटकार आणि १२ चौकार मारत
हरजस सिंग


कॅनबेरा, 5 ऑक्टोबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये भारतीय वंशाचा तरुण फलंदाज हरजस सिंगने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली. सिडनी क्रिकेट क्लबविरुद्ध वेस्टर्न सबर्ब्सकडून खेळताना हरजसने केवळ १४१ चेंडूत ३५ षटकार आणि १२ चौकार मारत ३१४ धावा केल्या.

या कामगिरीमुळे हरजसला क्रिकेट इतिहासातील एका अतिशय खास क्लबमध्ये स्थान मिळाले. मर्यादित षटकांच्या ग्रेड क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. न्यू साउथ वेल्स प्रीमियर फर्स्ट ग्रेड क्रिकेटमध्ये (लांब स्वरूपासह) त्रिशतक झळकावणारा तो तिसरा क्रिकेटपटूही ठरला. यापूर्वी, फक्त दोनच क्रिकेटपटूंनी म्हणजेच फिल जॅक्स (३२१ धावा) आणि व्हिक्टर ट्रम्पर (३३५ धावा) यांनी ही कामगिरी केली आहे.

सिडनीमध्ये जन्मलेला हरजस सिंग हा भारतीय वंशाचा आहे. २००० मध्ये त्याचे आईवडील चंदीगडहून सिडनीला आले. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड होती. हरजसने २०२४ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकातही चमकदार कामगिरी केली. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ६४ चेंडूत ५५ धावा केल्या होत्या. त्या सामन्यातील ऑस्ट्रेलियाची ही सर्वोच्च धावसंख्या होती. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २५३ धावांचा सन्मानजनक आकडा गाठला होता. ऑस्ट्रेलियाने २०२४ चा १९ वर्षांखालील विश्वचषकही जिंकला होता.

आपल्या विक्रमी खेळीनंतर हरजस सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, ही माझी आतापर्यंतची सर्वात उल्लेखनीय कामगिरी होती. मला याचा खूप अभिमान आहे. कारण मी ऑफ-सीझनमध्ये माझ्या पॉवर हिटिंगवर कठोर परिश्रम केले आणि आज त्याचे फळ मला मिळाले. हा माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. तो पुढे म्हणाला, गेल्या काही हंगामात, मी मैदानाबाहेरील गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करत होतो. पण आता मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करू लागलो आहे आणि त्याचे फायदे स्पष्टपणे दिसत आहेत.

हरजस सिंगच्या त्रिशतकामुळे तो आता ऑस्ट्रेलियन संघ निवडकर्त्यांच्या दृष्टीने एक प्रमुख दावेदार बनला आहे. सॅम कॉन्स्टास, ह्यू वेबजेन, महली बियर्डमन आणि ऑलिव्हर पीक यांसारखे त्याचे सहकारी आधीच राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत. सॅम कॉन्स्टासने कसोटी पदार्पणही केले आहे. हरजसची ही स्फोटक खेळी त्याच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा देणारी नाही. तर ऑस्ट्रेलियाकडे भविष्यातील आणखी एक सुपरस्टार निर्माण होत असल्याचे संकेत देखील देईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande