कॅनबेरा, 5 ऑक्टोबर (हिं.स.)बिग बॅश लीग संघ सिडनी थंडर रविचंद्रन अश्विनला खाजगी सुरक्षा पुरवणार आहे. ऑलिंपिक अरेना येथे संघाच्या सराव सत्रादरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. अश्विन आपल्या युट्यूब चॅनेलसाठी सिडनी थंडरसोबतच्या बीबीएल प्रवासाचे चित्रिकरण करण्यासाठी त्याच्यासोबत एक वैयक्तिक टीम देखील आणणार असल्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान, भारतीय संघाचे सराव सत्र पाहण्यासाठी सुमारे 5,000 भारतीय चाहते ऍडलेड ओव्हलवर जमले होते. ज्यामुळे सुरक्षेची चिंता निर्माण झाली होती. बीबीएल संघ हे टाळू इच्छित आहे. अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाजाच्या सराव आणि खेळादरम्यान सुरक्षेची चिंता उद्भवू शकते.
न्यू साउथ वेल्समधील सिडनी ऑलिंपिक पार्क हे एक खुले मैदान आहे. जिथे भारतीय चाहते सराव दरम्यान अश्विनला घेरू शकतात. सिडनी थंडरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली आहे की, या अत्यंत लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटूसाठी कोणते सुरक्षा उपाय करावेत. अश्विनला ऑस्ट्रेलियामध्ये खाजगी सुरक्षा पुरवली जाऊ शकते.
अश्विन जानेवारीमध्ये तीन ते पाच सामने खेळेल आणि सिडनी थंडर पात्र ठरल्यास अंतिम फेरी देखील खेळेल. सिडनी थंडर संघासोबत खेळताना ख्रिस गेलला राहण्यासाठी एक आलिशान पेंटहाऊस देण्यात आले होते. अश्विनलाही एक पेंटहाऊस दिले जाईल का असे विचारले असता, संघाचे जनरल मॅनेजर ट्रेंट कोपलँड म्हणाले, आम्ही खात्री करू की, तो आणि सर्व परदेशी क्रिकेटपटू येथे त्यांचा वेळ पूर्णपणे एन्जॉय करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे