वॉशिंग्टन , 5 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये तेलंगणाच्या दुसऱ्या युवकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. तेलंगणाच्या हैदराबाद येथील एलबी नगर परिसरातील रहिवासी पोले चंद्रशेखर याची अमेरिकेतील डलास शहरात काही लुटारूंनी गोळ्या झाडून हत्या केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आलेल्या या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
२५ वर्षीय चंद्रशेखर याने हैदराबादमधील एका कॉलेजमधून बीडीएसची पदवी घेतली होती. उज्वल भविष्याच्या शोधात तो अलीकडेच डलासला गेला होता. तिथे तो उच्च शिक्षणाबरोबरच एका गॅस स्टेशनवर पार्ट-टाईम नोकरी करत होता.
माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. सकाळच्या वेळेस काही अज्ञात लुटारूंनी गॅस स्टेशनमध्ये घुसून लुटीच्या उद्देशाने गोळीबार सुरू केला. यावेळी चंद्रशेखरच्या छातीत दोन गोळ्या लागल्या. त्याला रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. डलास पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजवली असून चंद्रशेखरच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. चंद्रशेखरचा मृतदेह भारतात आणावा, अशी मागणी पोल कुटुंबीयांनी केली आहे. यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ट्वीट करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि आश्वासन दिले की, मृतदेह भारतात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील. या घटनेची माहिती समजताच हैदराबादमध्ये, बीआरएस आमदार सुधीर रेड्डी आणि माजी मंत्री टी. हरीश राव यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या घटनेच्या सुमारे 15 दिवस आधी, अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे तेलंगणाच्याच आणखी एका युवकाची हत्या झाली होती. त्या मृतकाचे नाव मोहम्मद निजामुद्दीन असून तो तेलंगणातील महबूबनगरचा रहिवासी होता. तो 2016 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. त्याने फ्लोरिडा येथील एका कॉलेजमधून शिक्षण घेतले होते आणि दोन वर्षांनंतर एका कंपनीत नोकरी सुरू केली होती. त्याची हत्या चाकू हल्ल्यात करण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode