लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय जागेवरच निवड संधी अर्थात प्लेसमेंट ड्राईव्हचे 8 ऑक्टोबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नामांकित आस्थापना, उद्योजक सहभागी होणार आहेत. या आस्थापनेमध्ये दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा, तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.
या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील नामांकित एकूण 04 आस्थापना, उद्योजक सहभागी होणार आहेत. लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, लि.लातूर, मांजरा महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर, पावरकॉम व्हेंनचर्स इंडिया प्रा.लि. नीट इंडिया प्रा.लि. लातूर या आस्थापनेमध्ये एकूण 40 जागेसाठी विविध पदांसाठी जागेवरच निवड केली जाणार आहे. यासाठी बी.कॉम, एम.कॉम, एम.बी.ए. तसेच कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय. या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी 8 ऑक्टोबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीच्या पाच प्रतीसह उपस्थित रहावे, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis