अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून या निवडणुकांच्या दृष्टीने नेते, कार्यकर्त्यांनो कामाला लागा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावती विभागीय आढावा बैठकीत केले. बैठकीचे आयोजन व समन्वयक प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी मंचावर डॉ. सुनिल देशमुख, ॲड. गणेश पाटील, संध्याताई सव्वालाखे, खा. बळवंत वानखेडे, आ. अमित झनक, आ. धीरज लिंगाडे, आ. साजिद पठाण आदी नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या न. प., मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पक्षाची काय परिस्थिती आहे, किती जागी पक्ष मजबूत तर कुठे कमकुवत आहे या सर्व बाबींचा आढावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी अकोल्यातील आयोजित अमरावती विभागीय आढावा बैठकीत घेतला. या बैठकीचे यशस्वी आयोजन आणि समन्वयक म्हणून प्रकाश तायडे यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी त्यांनी अमरावती विभागातील प्रत्येक जिल्हानिहाय बैठक घेत जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, बूथप्रमुख, ब्लॉक अध्यक्ष यांच्याशी वैयक्तिक संवाद साधत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत माहिती जाणून घेतली. तर पक्षाला आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा कशा पद्धतीने मिळतील याचे सूक्ष्म नियोजन करण्याचा 'कानमंत्र' यावेळी दिला. तर यावेळी आढावा बैठकीत काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुद्धा पार पाडले. यामध्ये अन्य पक्षातील माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक बड्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी पाचही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष ते बूथप्रमुख, माजी नगरसेवक, जिल्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजी - माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
या आढावा बैठकीत अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, अकोला शहर या सर्व तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या हस्ते पक्षात प्रवेश घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे