अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.) | अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एका गोपनीय माहितीच्या आधारावर शहरात मोठी कारवाई करत, अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या, सवय जडणारी (नशायुक्त) तसेच कामोत्तेजक औषधे विक्रीसाठी साठवून ठेवलेला मोठा साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी रामपुरी कॅम्प परिसरात अवैध औषध साठ्याची माहिती मिळाली. यानुसार अधिकाऱ्यांनी रामपुरी कॅम्प, अमरावती येथील प्रतापसिंग ठाकुरानी यांच्या निवासस्थानाची चौकशी केली. चौकशीत प्रतापसिंग ठाकुरानी हे महानगरपालिकेच्या बगीच्यासमोर असलेल्या मे. अपना ड्रायफुटच्या वर, फ्लॅट क्र. 101, दुसऱ्या मजल्यावर राहत असल्याची माहिती समोर आली. एफडीएच्या पथकाने या फ्लॅटवर धाड टाकली असता, तिथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या, सवय जडणारी व गुंगी आणणारी औषधे तसेच कामोत्तेजक औषधांचा साठा आढळून आला. जप्तीदरम्यान या औषधांचे कोणतेही खरेदी बिल आरोपींकडे आढळले नाही.
उपस्थित आरोपी राहुल प्रतापसिंग ठाकुरानी आणि विश्वनाथ प्रतापसिंग ठाकुरानी यांनी हा औषध साठा विना बिलाने, कुठलाही परवाना नसताना धनंजय अंबुलकर, यवतमाळ यांच्याकडून खरेदी केल्याचे कबूल केले. हा साठा अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी तसेच नशेसाठी विक्री करिता साठवल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अवैधरित्या साठवलेल्या औषध साठ्यापैकी 3 औषधांचे नमुने पुढील चाचणी व विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. उर्वरित औषधे पंचनाम्याअंतर्गत जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी गाडगेनगर पोलिस स्टेशन, अमरावती येथे दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त, मि. कृ. काळेश्वरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (औषधे), डॉ. अ. मा. माणिकराव आणि औषध निरीक्षक (गुप्तवार्ता), म. वि. गोतमारे यांनी पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी