सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकर्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करा असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खते आणि बी-बियाण्यांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाणी दूत प्रदेश सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे उपस्थित होते.
यावेळी बोलताना नांदगावकर म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांची हाता तोंडाशी आलेली उभी पिके वाहून गेलेली असून शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक लोकांचे संसार उघडड्यावर पडलेले आहेत. तर अनेक शेतकर्यांची जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत. अनेक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सरकारने एनडीआरएफ किंवा इतर कोणत्याही अटी न लावता शेतकर्यांचे सरसकट पंचनामे करून सणासुदीच्या तोंडावर शेतकर्यांच्या खात्यामध्ये त्वरित पैसे जमा करणे गरजेचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड