छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात अलीकडील नैसर्गिक आपत्ती आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे दोन वर्ष नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये पर्यंत तात्काळ कृषी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे,असे जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी कळविले आहे.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे, खत, औषधे तसेच शेतीसंबंधित इतर आवश्यक खर्चासाठी त्वरित कर्ज मिळणार आहे. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ मिळेल. पूर किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या अर्जांना प्राधान्य दिले जाईल. जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील बँकेच्या सर्व ग्रामीण व अर्ध-शहरी शाखांमधून अर्ज करण्याची सुविधा. सर्व शाखांना तात्काळ कर्ज मंजुरी चे अधिकार दिले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत भेट द्या,असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी केले आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis