गडचिरोली, 6 ऑक्टोबर (हिं.स.)
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.
कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पार पडली.
या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक श्रीमती प्रीती हिरळकर, कृषी उपसंचालक कु. मधुगंधा जुलमे, आणि तंत्र अधिकारी श्री. आनंद कांबळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची माहिती सादर केली.
शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी मृद चाचणी प्रयोगशाळा, सौर कुंपण, सामुदायिक शेततळे, शिंगाडा लागवड, मोती उत्पादन, चारोळी–मोहफुल प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये १५ ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मंजुरी मिळाली असून, ग्रामपातळीवरच मृद आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे.
कृषी समृद्धी योजना, फलोत्पादन विकास अभियान, आणि फलोत्पादन यांत्रिकीकरण योजना यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. या योजनांअंतर्गत सामुदायिक शेततळ्यांना १०० टक्के अनुदान, आळंबी उत्पादन, शेडनेट, हरितगृह, पॅक हाऊस, प्रक्रिया केंद्र, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर खरेदीसाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ८० ते ९५ टक्क्यांपर्यंत अनुदानाच्या १६ नाविन्यपूर्ण प्रकल्पांची निवड करण्यात आली असून, यामध्ये सौर कुंपण, शेततळे स्तरीकरण, ड्रोन खरेदी, सेंद्रिय निविष्ठा केंद्र, चिकट सापळे उत्पादन आदी उपक्रमांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना थेट विक्रीची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आत्मा योजनेअंतर्गत सोनापुर प्रक्षेत्रात शेतकरी विक्री केंद्र उभारणीचे काम सुरू असून, शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके आणि शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन शेती तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना योजनांची अंमलबजावणी वेळेत, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी शासनाच्या सर्व योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond