रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ८ ऑक्टोबर रोजी त्याचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे.
उद्योग 4.0 युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व सेवा क्षेत्राशी सुसंगत प्रशिक्षण देऊन औद्योगिक क्षेत्रास आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्रातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या या नव्या अभ्यासक्रमांचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संस्थांचाही समावेश आहे. रत्नागिरीत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.
कार्यक्रमामार्फत अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता जिल्ह्यातील विविध कार्यलयांमार्फत औद्योगिक आस्थापना, औद्योगिक संघटना, लाडकी बहीण योजनाचे लाभार्थी, पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम योजनेचे लाभार्थी, द्विलक्षी अभ्यासक्रमाचे लाभार्थी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने शासकीय/अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेले, प्रशिक्षण पूर्ण केलेले आजी माजी प्रशिक्षणार्थी व पालक यांनी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी