परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून परभणी जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुखपद रिक्त होते. या रिक्त जागा अखेर भरल्या असून पक्षाने गंगाप्रसाद आणेराव यांची परभणी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख म्हणून, तर डॉ. विवेक नावंदर यांची परभणी महानगरक्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.
गंगाप्रसाद आणेराव यांच्याकडे परभणी व गंगाखेड दोन्ही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे, तर डॉ. नावंदर यांच्याकडे परभणी महानगरक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या स्थानिक संघटनेत स्थिरता येईल, अशी अपेक्षा आहे.फाटाफुटीच्या काळातही शिवसेना हा पक्ष परभणी जिल्ह्यातील बालेकिल्ला ठरला होता, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही जिल्हाप्रमुख पक्ष सोडून गेले. यापूर्वी विशाल कदम व संजय साडेगावकर हे जिल्हाप्रमुख होते. निवडणुकीदरम्यान साडेगावकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिला, तर निकालानंतर विशाल कदम हे एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. परिणामी जिल्हाप्रमुखपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते.
शिवसेनेच्या संघटनात्मक पद्धतीत संपर्कप्रमुख हे महत्त्वाचे पद मानले जाते. सुभाष भोयर हे संपर्कप्रमुख होते आणि या पदाचा मुख्य उद्देश जिल्ह्याच्या पक्ष संघटनेला नेतृत्वाशी जोडणे हा होता. परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून संपर्कप्रमुख नसल्याने स्थानिक संघटनेवर संघटनात्मक दबाव होता. आधी सहसंपर्कप्रमुख हे एकच पद होते, परंतु आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एक सहसंपर्कप्रमुख नियुक्त केला जातो.
जिल्ह्यातील या नियुक्तीमुळे परभणी महानगरपालिका, पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या सर्व निवडणुकांसाठी संघटनेला मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा आहे. गंगाप्रसाद आणेराव यांनी यापूर्वीही जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी पार पाडली असून, डॉ. नावंदर यांनी सहसंपर्कप्रमुखपद सांभाळले आहे. या नियुक्तीमध्ये खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील यांच्यात समन्वय राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis