कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा दूध विक्रीत नवा उच्चांक
कोल्हापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यादिवशी तब्बल २० लाख २८ हजार ५२६ लिटर दूध विक्री करून गोकुळने विक्रमी कामगिरी नोंदवली. य
गोकुळ दूध संघ


कोल्हापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यादिवशी तब्बल २० लाख २८ हजार ५२६ लिटर दूध विक्री करून गोकुळने विक्रमी कामगिरी नोंदवली. याबाबतची माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.

यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, “गोकुळने आपल्या उच्च गुणवत्तेच्या व विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहकांची मन जिंकली आहेत. ग्राहकांचा विश्वास आणि दूध उत्पादकांचा सहभाग हाच आमच्या प्रगतीचा पाया आहे. भविष्यात दररोज २० लाख लिटर दूध विक्रीचे उद्दिष्ट ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा यासारख्या दुग्धजन्य उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या यशामध्ये दूध उत्पादक, संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी आणि वाहतूक ठेकेदार यांचे सहकार्य मोलाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गोकुळने १८ लाख ६४ हजार ७५९ लिटर दूध विक्री केली होती, तर यंदा विक्रीत तब्बल १ लाख ६३ हजार ७६७ लिटरने वाढ झाली आहे. गोकुळने दूध संकलन आणि विक्री या दोन्ही क्षेत्रांत सातत्याने चढता आलेख राखला असून, गुणवत्तेवर आधारित कामगिरी व ग्राहकांचा विश्वास यामुळे गोकुळने नवनवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. या विक्रमी विक्रीत संघाच्या मार्केटिंग विभागाने अत्यंत प्रभावी नियोजन आणि अमंलबजावणी केली असून याबद्दल डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande