अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)
सर्वसामान्य व गरजूंना केवळ दहा रुपयात जेवण देऊन भूक भागविणाऱ्या शिवभोजन केंद्राच्या संचालकांचे मागील आठ महिन्यांचे अनुदान थकीत आहे. परिणामी स्वतःच्या कुटुंबासह गरजूंची भूक भागवायची कशी, असा प्रश्न केंद्र संचालकांना पडला आहे.गरजूंची भूक भागविता यावी, यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण राज्यात शिवभोजन केंद्राची योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरजूंना केवळ दहा रुपयांत भोजन देण्याची तरतूद आहे. शहरी भागातील केंद्राला शासनाकडून एका थाळीवर ४० रुपये अनुदान, तर ग्राहकांकडून दहा रुपये ग्रामीण भागातील केंद्राला शासनाकडून एका थाळीवर २५ रुपये अनुदान, तर ग्राहकांकडून दहा रुपये घ्यायचे असतात. मात्र, मागील मार्च २०२५ पासून ऑक्टोबरपर्यंतचे तब्बल आठ महिन्यांचे अनुदान थकीत आहे. अनेकदा थकीत अनुदान देण्याची मागणी केंद्र संचालकांकडून करण्यात आली. मात्र, अद्याप त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही. परिणामी केंद्र संचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी पंधरवाड्यावर आली आहे. त्यात अनुदान नसल्याने अडचणींचा सामन करावा लागत आहे. अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या केंद्रसंचालकांनी अधिकारी बिले टाकण्यात आली आहेत, लवकरच अनुदान येईल, असे सांगून वेळ मारून नेत असल्याचा आरोपही केंद्रसंचालकांनी केला आहे.
दसऱ्यामध्ये अनुदान मिळेल, अशी अपेक्षा केंद्र संचालकांना होती. मात्र, अद्यापही अनुदान देण्यात आले नाही. पंधरवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. यातही अनुदान मिळाले नाही तर केंद्र संचालकांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
अनेक केंद्र बंद होण्याच्या मार्गावर
अनुदान देण्यास सातत्याने विलंब होत असल्याने अनेकांनी केंद्र बंद करण्याचा निर्धार केला आहे.आठ महिन्यांपासून अनुदानच नाही, त्यातच वाढलेली महागाई आणि शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान यात भागवायचे कसे, असा प्रश्न आहे. शासनाने त्वरित अनुदान द्यावे. - केंद्रसंचालक
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी