सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्ह्यात सप्टेंबर2025या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अप्पर मंद्रूप तहसील कार्यालयांतर्गत होनमुर्गी गावाला ही सीना नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसून अर्धे गाव पाण्यात गेलेले होते. आज या ठिकाणच्या पूरबाधित नागरिकांना जिल्हा प्रशासन व अक्षय पात्र या संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या 250 किटचे वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे,अपर तहसीलदार सुजित नरहरे,गटविकास अधिकारी शंकर कवीतके,अक्षय पात्र संस्थेचे प्रतिनिधी उपेंद्र नारायण दास,मंडळ अधिकारी राणा वाघमारे,ज्योतिबा पवार,सरकार जी,तलाठी बाबलादी,सरपंच सुभाष तेली तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी होनमुर्गी येथे पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेचे ही पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच पुराच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतामधील पिके तर वाहून गेलीच परंतु मातीही मोठ्या प्रमाणावर वाहून गेलेली आहे. त्यामुळे पुढील काळात शेती करणे अवघड असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी त्यांना धीर देत गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार तसेच मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना मदत केली जाईल,असे सांगितले. तसेच ऊसshसर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतचे आदेशित केले असल्याचेही त्यांनी सांगितले. पुराचे पाणी जाऊन घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रत्येकी दहा हजार रुपये थेट त्यांच्या अकाउंटवर देण्यात आलेले आहेत. तसेच पुढील काळात ग्रामस्थांना जी मदत आवश्यक आहे,ती सर्व प्रकारची मदत प्रशासन करेल असेही त्यांनी सांगितले.
मोजे होनमुर्गी येथेही सीना नदीला पूर येऊन अर्धेगाव पुराच्या पाण्यात गेलेले होते. परंतु प्रशासनाने अत्यंत तत्परतेने गावातील लोकांना समजावून सुरक्षित स्थळी घेऊन गेल्याने एकही जीवित हानी झालेली नाही. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाचे कौतुक करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे समाधान व्यक्त केले.
प्रशासनाने पूर परिस्थिती येण्यापूर्वीच गावातील सर्व लोकांना तेरामैल येथे निवारा केंद्रात सुखरूप स्थलांतरित केले होते. या ठिकाणी240नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती प्रशासनाच्या वतीने यांना दोन वेळा जेवण पुरवले जात होते. तसेच प्रशासन व सामाजिक संस्था कडून आलेले सर्व प्रकारची मदत ग्रामस्थांना वाटप करण्यात आलेली आहे.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधक स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड