वैद्यकशास्त्रातील तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर
स्टॉकहोम, 6 ऑक्टोबर (हिं.स.) - येथील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील समितीने वैद्यकशास्त्रातील पुरस्कार जाहीर करून यंदाच्या नोबेल पुरस्कारांची सुरुवात केली आहे. वैद्यकशास्त्रातील तीन शास्त्रज्ञांमध्ये मेरी ई. ब्रुंको (अमेरिका), फ्रेड रॅम्सडेल (ब्रिटि
नोबेल पुरस्कार वैद्यकशास्त्र तीन शास्त्रज्ञ


स्टॉकहोम, 6 ऑक्टोबर (हिं.स.) - येथील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील समितीने वैद्यकशास्त्रातील पुरस्कार जाहीर करून यंदाच्या नोबेल पुरस्कारांची सुरुवात केली आहे. वैद्यकशास्त्रातील तीन शास्त्रज्ञांमध्ये मेरी ई. ब्रुंको (अमेरिका), फ्रेड रॅम्सडेल (ब्रिटिश) आणि शिमोन साकागुची (जपान) यांना परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेच्या (पेरीफेरल इम्यून टॉलरन्स) क्षेत्रातील संशोधनासाठी सन्मानित केले जाणार आहे. विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोना (सुमारे 9 कोटी रुपये) इतकी रक्कम, सोन्याचे पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. हा पुरस्कार सोहळा 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे पार पडेल. भौतिकशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या विविध क्षेत्रांतील नोबेल पुरस्कारांची घोषणा आजपासून सुरू झाली असून 13 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. 1901 ते 2024 दरम्यान हा सन्मान 115 वेळा 229 नोबेल विजेत्यांना प्रदान करण्यात आला आहे.

पेरीफेरल इम्यून टॉलरन्स म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली (इम्यून सिस्टीम) स्वतःच्या ऊतींवर (टिश्यू) हल्ला करत नाही, या घटनेला पेरीफेरल इम्यून टॉलरन्स म्हणतात. म्हणजेच शरीराची इम्यून सिस्टीम जेव्हा स्वतःच्या पेशी आणि प्रोटीनना आपलेच ओळखते आणि त्यांच्यावर चुकीचा हल्ला करत नाही, तेव्हा ती प्रणाली योग्यरित्या कार्यरत असते.

कर्करोगाच्या उपचारात मदत करणारे संशोधन

या संशोधनामुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये तसेच अवयव प्रत्यारोपण (ऑर्गन ट्रान्सप्लांट) प्रक्रियेत मोठी मदत होणार आहे. नोबेल कमिटीने म्हटले आहे की- या संशोधनाने वैद्यकशास्त्राला नवी दिशा दिली आहे.

आपल्या शरीरातील इम्यून सिस्टीमचे मुख्य कार्य म्हणजे विषाणू (व्हायरस), जीवाणू (बॅक्टेरिया) आणि इतर हानिकारक घटकांपासून शरीराचे रक्षण करणे. परंतु काही वेळा हीच प्रणाली चुकीने शरीरातील स्वतःच्या पेशींना परकीय समजते आणि त्यांच्यावर हल्ला करते. त्यामुळे ऑटोइम्यून रोग जसे की टाईप-1 डायबिटीज आणि रुमेटॉइड आर्थरायटिस निर्माण होतात. पेरीफेरल इम्यून टॉलरन्स प्रणाली अशा वेळी शरीरातील सेल्फ अँटीजन ओळखून त्या विरुद्ध होणारी चुकीची प्रतिक्रिया थांबवते. ती प्रणाली ओळखते की कोणते सेल आणि प्रोटीन शरीराचे स्वतःचे आहेत. जर कुठली टी-सेल शरीरातील पेशींवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते, तर पेरीफेरल इम्यून टॉलरन्स त्या पेशींना निष्क्रिय करते किंवा नष्ट करते.

तीनही विजेत्यांविषयी थोडक्यात माहिती

मेरी ई. ब्रुंको : अमेरिकन वैज्ञानिक, जीन संशोधन क्षेत्रात काम.

फ्रेड राम्सडेल : ब्रिटिश मूळचे वैज्ञानिक, इम्यून सिस्टीम तज्ज्ञ.

शिमोन साकागुची : जपानी वैज्ञानिक, टी-सेल्सच्या शोधासाठी प्रसिद्ध.

नोबेल पुरस्काराचा इतिहास

नोबेल पुरस्कारांची स्थापना 1895 साली झाली आणि प्रथम पुरस्कार 1901 साली देण्यात आला. 1901 ते 2024 दरम्यान वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात एकूण 229 वैज्ञानिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे पुरस्कार वैज्ञानिक आणि शोधक अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार दिले जातात. सुरुवातीला फक्त भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमध्ये नोबेल दिले जात होते. नंतर अर्थशास्त्र (Economics) या क्षेत्रालाही यात समाविष्ट करण्यात आले.

नोबेल प्राइजच्या अधिकृत संकेतस्थळानुसार कोणत्याही क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या व्यक्तींची नावे 50 वर्षांपर्यंत गोपनीय ठेवली जातात.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande