रायगड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
अलिबाग एसटी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षातील फोन बंद असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सतत येत आहेत. एसटीच्या वेळेची माहिती घेण्यासाठी प्रवासी नियमित संपर्क साधत असतात, परंतु गेल्या दीड महिन्यांपासून फोन कायम व्यस्त अथवा बंद असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
अलिबाग एसटी बस आगार जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असून येथे साठहून अधिक एसटी बसेस कामकाज करतात आणि हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. प्रवाशांना वेळेची अचूक माहिती मिळावी, यासाठी स्थानकात वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षामध्ये वाहतूक निरीक्षक दर्जाचे अधिकारी बसांचे वेळापत्रक आणि हालचाल नियंत्रित करतात.
स्थानीय प्रवाश कृष्णकांत पाटील यांनी सांगितले, “फोन नेहमी व्यस्त अथवा बंद असल्याने बसच्या वेळेची माहिती मिळत नाही, वारंवार संपर्क साधूनही उत्तर मिळत नाही. त्यामुळे आगारातील कारभाराबाबत नाराजी वाढली आहे.” आमच्या प्रतिनिधी यांनी देखील फोन लावून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क साधणे शक्य झाले नाही.
एसटी बस स्थानकात फक्त फोन बंद राहणेच नव्हे, तर रस्त्यात बंद पडलेल्या बसेस, स्थानकात पडलेले खड्डे आणि देखभालीचा अभाव अशा अनेक समस्या आहेत. प्रवाशांनी आगार व्यवस्थापकांकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे.
आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी सांगितले, “स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षातील फोन बंद आहे की नाही याची तपासणी करून तात्काळ दुरुस्ती केली जाईल. तसेच निरीक्षकांकडून फोन उचलण्यात टाळाटाळ होत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके