अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)
अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरात प्लास्टिक जप्ती मोहिमेला गती मिळाली असून त्याअंतर्गत मनपा उत्तर झोन क्र. १ इतवारा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात आली.महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त (प्रशासन) डॉ. मेघना वासनकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या आदेशानुसार आज सकाळपासून मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण २० आस्थापना, हातगाड्या, भाजीपाला व फळ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी व्यापाऱ्यांकडे कागदी पिशव्यांचा तसेच ५० मायक्रोनपेक्षा जास्त जाडीच्या पिशव्यांचा वापर होत असल्याचे दिसून आले. मात्र हाजी जनरल स्टोअर या दुकानात बंदी असलेले प्लास्टिक आढळल्याने त्या दुकानावर महानगरपालिकेने थेट ५,००० रुपये दंड ठोठावला.
प्लास्टिकचा वापर बंद करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही काही व्यापारी अजूनही बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर करत असल्याने महापालिकेने अशा दुकानांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले की नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनांवर पुढील काळात अधिक मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कार्यवाही होणार आहे.
या कारवाईत जेष्ठ स्वास्थ निरीक्षक आर. के. डिक्याव, प्लास्टिक पिशवी जप्ती पथक प्रमुख विक्की जैदे, अनिकेत महल्ले, स्वास्थ निरीक्षक विनोद टांक, मिथुन उसरे, प्रविण उसरे, इम्रान खान, निखिल खंगाळे व सचिन सैनी यांची सक्रिय उपस्थिती होती.
महापालिकेच्या या मोहिमेमुळे परिसरात प्लास्टिकच्या वापरास आळा बसून नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याबाबत जनजागृती वाढण्यास मदत होत आहे.
महानगरपालिका प्रशासनाने आवाहन केले आहे की, व्यापाऱ्यांनी तात्काळ प्लास्टिकचा वापर थांबवून कागदी, कापडी किंवा जूट पिशव्यांचा वापर करावा. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी