परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून या सोडतीत पूर्णा, गंगाखेड आणि मानवत येथील नगराध्यक्षपदे खूल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहेत. तर पाथरी नगराध्यक्षपद खूल्या प्रवर्गासाठी, सेलू नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी, तसेच सोनपेठ आणि जिंतूर व पालम नगराध्यक्षपदे इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव ठरली आहेत.
राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठीची सोडत मुंबई येथील मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात घेण्यात आली. या सोडतीस राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
कार्यक्रमास राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आरक्षण जाहीरतेनंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis