रायगडात खड्ड्यांविरोधात शेकापचा रस्ता रोको इशारा
रायगड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील रस्ते नागरिकांसाठी आता जीवघेण्या ठरले आहेत. खड्डे, पाणथळ भाग आणि उखडलेले मार्ग यामुळे प्रवास धोकादायक झाला असून, गेल्या दोन महिन्यांत तब्बल तीनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक कायमच्या
रायगडातील रस्ते मृत्यूचे सापळे; शेकापचा खड्ड्यांविरोधात रस्ता रोको इशारा


रायगड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

रायगड जिल्ह्यातील रस्ते नागरिकांसाठी आता जीवघेण्या ठरले आहेत. खड्डे, पाणथळ भाग आणि उखडलेले मार्ग यामुळे प्रवास धोकादायक झाला असून, गेल्या दोन महिन्यांत तब्बल तीनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक कायमच्या अपंगत्वासह जगत आहेत. यावर शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे.

चित्रलेखा पाटील म्हणाल्या, “खड्ड्यांविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणारच.” त्यांनी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पेझारी चेक पोस्ट येथे रस्ता रोको आंदोलन आयोजित करणार असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, प्रशासन निष्क्रिय राहिले तर संपूर्ण जिल्हा ठप्प करण्याची तयारी शेकापने ठेवली आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला ४० कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला होता, त्यापैकी ३८ कोटी २१ लाख रुपये वितरित झाले, परंतु प्रत्यक्षात फक्त १६ कोटी रुपये इतकेच काम झाले. शिल्लक निधी कुठे गेला याबाबत प्रशासनाकडे कोणतेही स्पष्ट उत्तर नाही. गेल्या वर्षीही कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते दुरुस्त केले, तरी आजही रस्त्यांची अवस्था बिकटच आहे.

विशेषतः अलिबाग-रेवस, अलिबाग-मुरुड आणि अलिबाग-वडखळ रस्त्यांची अवस्था गंभीर आहे. काही ठिकाणी विकासाच्या नावाखाली रस्ते उखडले गेले आणि गायब झाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र आणि दैनंदिन प्रवासासाठी नागरिकांना जीव धोक्यावर टाकावा लागत आहे.

चित्रलेखा पाटील यांनी स्पष्ट सांगितले, “रस्त्यांच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार थांबवला नाही, तर आम्ही संपूर्ण जिल्हा ठप्प करू!” शेकापच्या या उपक्रमामुळे प्रशासनाला जाग येणे आवश्यक ठरणार आहे. ग्रामस्थांचे जीवन व सुरक्षितता या मुद्द्यावर आता सत्ताधारी आणि अधिकारी लक्ष देणे टाळू शकणार नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande