परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
गेल्या काही महिन्यांपासून गंगाखेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन केले. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे, पशुधनाचे तसेच जमिनींचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने ही परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असून, तातडीने गंगाखेड तालुका “ओला दुष्काळग्रस्त” घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण गंगाखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ७० हजार रुपये अनुदान द्यावे. अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या जनावरांना बाजारभावानुसार नुकसानभरपाई द्यावी. गंगाखेड तालुक्याला अतिवृष्टी अनुदान यादीत तात्काळ समाविष्ट करावे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत द्यावी. अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाखांची मदत द्यावी.
शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या वेळी शुद्धोधन सावंत, शिवराव मुंढे, अर्जुन फड, लालू जाधव, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis