जळगाव, 6 ऑक्टोबर (हिं.स.) - कामानिमित्त भुसावळ येथे आलेल्या मित्रांमध्ये आपसात वाद झाल्यावरून जळगाव येथील तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील कंडारी शिवारात घडली आहे. या संदर्भातील माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०) या तरुणाचा किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयित आरोपी जळगाव येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. जितेंद्र हे जळगाव शहरातील तीन जणांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका कामानिमित्त गेले होते. तिथे एका हॉटेलमध्ये मद्यपानदरम्यान चौघांमध्ये वाद झाला, जो पुढे हाणामारीत परिवर्तित झाला. वादाच्या दरम्यान तिघांनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ व रुग्णालय गाठले. जितेंद्र साळुंखे यांचा मृतदेह पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. जितेंद्र हा पत्नी आणि तीन मुलांसह जळगाव येथे राहात होता आणि हातावर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. जितेंद्र साळुंखे हा एका कामानिमित्त जळगाव शहरातील आपल्या तीन मित्रांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे गेला होता. याच वेळी ही घटना घडली. दरम्यान पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने अवघ्या काही तासात तीन संशयित आरोपी राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (वय ३८), मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२), दोन्ही राहणार शिवाजी नगर जळगाव आणि दीपक वसंत शंखपाळ, रा. कंडारी, भुसावळ यांना अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर