कोकणची समृद्ध नमनकला पुस्तकात जतन - उदय सामंत
रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : कोकणची समृद्ध नमनकला पुस्तकात जतन झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. चिपळूण येथील प्रा. संतोष गोनबरे यांनी लिहिलेल्या ‘नमन – कोकणची समृद्ध लोक संस्कृती’ या पुस्तकाचे प्रकाशन हातखंबा येथे पार
नमन पुस्तकाचे प्रकाशन


रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : कोकणची समृद्ध नमनकला पुस्तकात जतन झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

चिपळूण येथील प्रा. संतोष गोनबरे यांनी लिहिलेल्या ‘नमन – कोकणची समृद्ध लोक संस्कृती’ या पुस्तकाचे प्रकाशन हातखंबा येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोकणची गौरवशाली नमन लोककला केवळ एक परंपरा नसून ती आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख आहे. याच अमूल्य वारशाचे दस्तऐवजीकरण करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे पाऊल या पुस्तकाच्या रूपाने उचलण्यात आले आहे. नमन ही हिंदू संस्कृती जपणारी आणि समाजाला एकत्र आणणारी एक शक्ती आहे.

​नमन लोककला रत्नागिरी जिल्हा, मातृसंस्था या संस्थेने आयोजित केलेल्या या सोहळ्यात बोलताना पालकमंत्री सामंत यांनी पुस्तकाचे लेखक संतोष गोनबरे यांचं मनःपूर्वक अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, आजच्या तरुण पिढीने शिक्षणात प्रगती करत असतानाच आपल्या मूळाशी जोडून राहणे गरजेचे आहे. रामायण-महाभारतासारख्या ग्रंथांमधून प्रेरणा घेऊन आपल्या पूर्वजांनी ही कला टिकवली, ती पुढे नेणे ही आता आपली जबाबदारी आहे.

​​लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सर्व नमन मंडळांनी नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा आणि लाभांचा फायदा घ्यावा, असे ते म्हणाले.

प्रकाशन समारंभाल लोककलावंत सुनील बेंडखळे, सचिन काळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande