अकोला, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। सीसीआयकडून कापूस खरेदी करिता निर्धारित केलेली ३० सप्टेंबर २०२५ ही नोंदणीची मुदत तसेच खरेदीचा कालावधी वाढवून देण्यात यावा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे शिष्ट मंडळ तसेच उप महा प्रबंधक, भारतीय कापूस निगम अकोला यांचे सोबत संयुक्त बैठक घेऊन योजनेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी निर्देश दिले.
सन २०२५-२६ मधील उत्पादित कापसाची खरेदी करण्यासाठी भारतीय कापूस निगम (सीसीआय) यांनी “कपास किसान” या AAP ची निर्मिती केली असून कापूस खरेदी योजना डीजीटल माध्यमाद्वारे राबविण्यात येणार असल्याने मानवी हस्तक्षेप काढून योजना पारदर्शीपणे राबविण्यात येणार आहे. या वर्षी सतत झालेली अतिवृष्टी आणि लांबलेला पावसाळा लक्षात घेता कापूस हंगाम लांबणार असल्यामुळे कापूस खरेदी करिता निर्धारित केलेली दिनांक ३० सप्टे २०२५ ही मुदत वाढवून देण्यात यावी तसेच खरेदीचा कालावधी सुद्धा वाढविण्यात यावा अशी सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी चर्चेच्या प्रारंभाला केली. या वर्षी सीसीआय कडून कापूस खरेदी योजना अतिशय पारदर्शक व सक्षम करण्यासाठी तयार केलेल्या “किसान कपास” या ऍपचा वापर शेतकऱ्यांनी कसा करावा या बाबत संबंधित यंत्रणेकडून प्रात्यक्षिका द्वारे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर ऍपचा वापर कापूस उत्पादकांनी कसा करावा या करिता सीसीआयकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व माहिती देण्याची सुचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली. खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी शेतकरी आधारकार्ड व त्याला जोडून असलेले बँक खाते आवश्यक आहे. खरेदी केंद्र निवडण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात आलेली असून कापूस विक्री करणारा शेतकरी प्रत्यक्षात उपस्थित असावा अशी टाकलेली अट मात्र काढून टाकण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली.
सदर ऍपवर नोंदणी करतांना माहिती भरल्यावर खातेदाराला ओटीपी प्राप्त होतो शिवाय त्याच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने विक्री करतांना संबंधित शेतकरी उपस्थित असावा ही अट व्यवहार्य वाटत नसल्याने ही बाब राज्य शासन केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून काढून टाकण्यासाठी प प्रयत्न करणार असल्याचे आमदार सावरकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये १५ ऑक्टोबर पासून कापूस खरेदी सुरु करण्याचे नियोजित असल्याचे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये जास्तीत कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली. बैठकीला उप महा प्रबंधक ब्रिजेश कासान, भारतीय कापूस निगमचे प्रवीण साधू, तिवारी, तसेच शेतकरी शिष्टमंडळाचे राजेश बेले, अनिल गावंडे, डॉ. अमित कावरे, शंकरराव वाकोडे, अंबादास उमाळे, प्रविन हगवणे, चंदू खडसे, राजेश ठाकरे विवेक भरणे, भरत काळमेघ संतोष डोंगरे, लव्ह भटकर, गजानन राउत, दशरथ फोकमारे गजानन बेले, रामदास बेले, बाळूभाऊ बहाकर निलेश फोकमारे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे