सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.) : एका तडीपार केलेल्या नेत्याच्या कार्यक्रमाला सोलापूरमध्ये आमदारानं उपस्थिती लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आमदार विजयकुमार देशमुख हे तडीपार गुंडाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. शिवाय त्यांनी भाजपच्याच शहराध्यक्षाला सुनावताना दमदाटी करणाऱ्यांच्या कमरेत लाथा घाला असं भाष्य केलंय. यामुळे पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलीय. सोलापूर आणि धाराशिवमधून श्रीशैल हुळ्ळे याला तडीपार केलं होतं. त्यानं आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीला भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते. लोक समाजाची बैठक का घेतली नाही असं म्हणता. पण जर अशी कोणी दमदाटी करत असेल तर त्यांच्या कमरेत लाथा घाला. हयगय करू नका असं विधान विजयकुमार देशमुख यांनी केलंय.भाजपच्याच शहराध्यक्षाला विजयकुमार देशमुख यांनी सुनावलंय. शहराध्यक्षांचं वागणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. कोणीतरी कुठल्यातरी पक्षातून आमच्याकडे येतात. चमचेगिरी करत इथं येऊन दादागिरी केल्यास खपवून घेणार नाही. आपण सगळे वीरशैव लिंगायत आहोत असंही देशमुख म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड