भुवनेशवर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।ओडिसाच्या ब्रह्मपूर शहरात सोमवारी (दि.६) रात्री भाजप नेते आणि ज्येष्ठ वकील पीताबास पांडा यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना शहराच्या ब्रह्मनगर भागात त्यांच्या घरासमोरच घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे 10 वाजता दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवर ब्रह्मनगर भागात पीताबास पांडा यांच्या घराजवळ आले. जसे पांडा घराबाहेर आले, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि दोघेही हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ पांडा यांना ब्रह्मपूर येथील एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.
या घटनेनंतर वकिलांमध्ये संताप आहे तर भाजप कार्यकर्त्यांनी दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. या हत्येची निंदा करताना अखिल ओडिसा वकील संघाचे अध्यक्ष अधिवक्ता ज्ञान रंजन मोहंती यांनी हे कृत्य “फक्त एका व्यक्तीची हत्या नसून, संपूर्ण न्यायप्रणाली आणि कायद्याच्या राज्यावर थेट हल्ला आहे” असे म्हटले. त्यांनी ओडिसाचे मुख्यमंत्री, गृह सचिव, राज्याचे पोलिस महासंचालक, दक्षिण विभागाचे डीआयजी आणि गंजामचे एसपी यांना त्वरित कारवाई करून सर्व दोषींना अटक करण्याचे आवाहन केले.
पीताबास पांडा हे एक प्रतिष्ठित वकील आणि ओडिसा राज्य बार कौन्सिलचे सदस्य होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते केवळ एक अनुभवी वकील नव्हते, तर समाज आणि राजकारणातही सक्रिय होते.
ब्रह्मपूर शहर आणि गंजाम जिल्ह्यात त्यांनी पूर्वीच्या सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचार आणि अनियमिततांविरोधात आवाज उठवला होता.त्यांच्या अमानुष हत्येमुळे केवळ कायद्याच्या क्षेत्रातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही शोकाची लाट पसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode