अश्विनी वैष्णव यांनी बल्लारपूर आणि चंद्रपूरच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा दिला शब्द
चंद्रपूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन चंद्रपूरमधील विविध समस्या सोडविण्याच्या संदर्भात निवेदन दिले. यामध्ये बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील ठळक विषयांच्य
अश्विनी वैष्णव यांनी बल्लारपूर आणि चंद्रपूरच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा दिला शब्द


चंद्रपूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन चंद्रपूरमधील विविध समस्या सोडविण्याच्या संदर्भात निवेदन दिले. यामध्ये बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील ठळक विषयांच्या संदर्भातील निवेदनांचा समावेश होता. दरम्यान अश्विनी वैष्णव यांनी चंद्रपूरच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन तातडीने निराकरण करण्याचा शब्द आ. मुनगंटीवार यांना दिला.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात वस्ती विभागातील गोल पुलिया हा नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. सध्या रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अश्या परिस्थितीत गोल पुलिया जवळील रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता आहे, ही बाब आ. मुनगंटीवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली.

बल्लारशा रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. स्थानकातील सुविधा, प्रवाशांच्या गरजा आणि आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन बैठक घेण्यात यावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रय्यतवारी व लखमापूर परिसरात नवीन रेल्वे लाईनच्या कामामुळे मागील २५ वर्षांपासून राहणाऱ्या मजूर कुटुंबांना स्थलांतराची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन होणे अत्यावश्यक आहे, ही बाब आ. मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.

बल्लारपूर येथील मध्य रेल्वेच्या मालकीच्या जागेवर गेल्या ४०-४५ वर्षांपासून विविध व्यापारी आपला व्यवसाय करत आहेत. ही जागा रेल्वेकडून लीजवर देण्यात आलेली आहे. रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांच्या दि. २६ जुलै २००४ च्या पत्रानुसार, अशा प्रकरणांमध्ये मूळ लायसन्सधारकांच्या जागी सध्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अपवादात्मक स्वरूपात नवीन करार (Agreement) करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासन, नागपूर मंडळाने २०११ मध्ये सर्वेक्षण करून ९ व्यापाऱ्यांचे नवीन करार करण्यास मान्यता दिली होती. मात्र, आजपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांना नवे करार देण्यात आलेले नाहीत. काही व्यापाऱ्यांनी या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केल्या असून न्यायालयाने रेल्वेला याबाबत कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बल्लारपूर शहरातील रेल्वेच्या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांशी नवीन भूमी करार करण्यास आवश्यक ती तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागेल आणि स्थानिक व्यापाऱ्यांना न्याय मिळेल, अशी विनंती मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande