बिलासपूर, 07 ऑक्टोबर (हिं.स.) : हिमाचलप्रदेशच्या बिलासपूरमध्ये एका खासगी बसवर भूस्खलन झाल्यामुळे आतापर्यंत 15 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. तर इतर काही जखमींवर बरठी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात मरोतनहून घुमारवींकडे जात असलेल्या संतोषी नावाच्या खाजगी बसवर शुक्र खड्डच्या काठावर असलेल्या बरठींमधील भल्लू पुलाजवळ डोंगरावरून अचानक भूस्खलन झाले. या भूस्खलनाचा ढिगारा थेट बसवर कोसळला आणि बसच्या छताचा काही भाग उडून खड्डाच्या काठावर जाऊन पडला. पूर्ण बसवरच ढिगारा कोसळल्याने ती संपूर्णपणे त्याखाली दबली. या घटनेत रात्री 9 वाजेपर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. दोन मुली आणि एका मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी एका मुलीची आई या अपघातात मृत्युमुखी पडली आहे. वाचलेल्या मुलींचे प्राथमिक उपचार बरठीं येथील रुग्णालयात सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये सुमारे 35 प्रवासी होते. ही दुर्घटना संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास घडली. या बसमध्ये मरोतन, बरठीं, घुमारवीं आणि यामधील इतर स्थानकांतील प्रवासी होते. चालक आणि परिचालक दोघांचाही मृत्यू झाला आहे. अद्याप कोणत्याही मृतांची ओळख पटलेली नाही.
या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केल्या असून, मृत आत्म्यांच्या शांतीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, या कठीण काळात राज्य सरकार पूर्ण ताकदीने प्रभावित कुटुंबांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. मुख्यमंत्री सतत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि त्यांनी बचाव व मदत कार्य अधिक वेगाने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याची आणि त्यांच्या उपचारांची संपूर्ण व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री शिमल्याहून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके