चंद्रपूर - जिल्हाधिका-यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
चंद्रपूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, जसे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 7) कायदा व सु
चंद्रपूर - जिल्हाधिका-यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा


चंद्रपूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, जसे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 7) कायदा व सुव्यवस्थेबाबत यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, महानगर पालिकेच्या प्रभारी आयुक्त्‍ डॉ. विद्या गायकवाड, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभम दांडेकर, तहसीलदार विजय पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे. स्थानिक स्तरावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी पोलिस विभाग तसेच इतर यंत्रणांशी योग्य समन्वय ठेवावा. आतापासूनच स्थायी निगराणी पथक व फिरते निगराणी पथकाचे नियोजन करावे. आपापल्या हद्दितील चेक पोस्ट वर तपासणी नियमितपणे सुरू ठेवावी.

निवडणूक विषय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे निवडणुकीसंदर्भातील कायदे व नियमांचे अधिका-यांनी वाचन करावे. यात कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. उपविभागीय अधिका-यांनी आपापल्या स्तरावरील तडीपारच्या प्रकरणांचा त्वरीत आढावा घ्यावा. तडीपारची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी. तालुका स्तरावरील दक्षता समितीच्या बैठका नियमितपणे घेऊन उपविभागीय पोलिस अधिका-यांना या बैठकीत आमंत्रित करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande