नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यामध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना दूध संकलन व चारा लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
विदर्भ आणि मराठवाड्यात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा मदर डेअरीच्या सहकार्याने बुटीबोरी, नागपूर व इतर ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या दुग्धविकास प्रकल्पाच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत नवी दिल्लीत बैठक झाली. राज्याचे पशुसंवर्धन सचिव एन. रामास्वामी, आयुक्त प्रवीणकुमार देवरे, एनडीडीबीचे चेअरमन डॉ. शहा, विदर्भ-मराठवाडा दुग्ध प्रकल्पाचे संचालक डॉ. बोरानी व डॉ. श्रीधर आदी यावेळी उपस्थित होते.
विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धविकास क्षेत्रात उपलब्ध असलेल्या ज्यादा दुधाचे संकलन करणे, दुग्धविकास, दुधाळ जनावरांची संख्या वाढविणे, या माध्यमातून या भागातील स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे व शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे हा या प्रकल्प राबविण्यामागे शासनाचा उद्देश आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील ११ जिल्हयात राबविण्यात आला होता. आता दुसर्या टप्प्यात विदर्भातील ११ व मराठवाड्यातील ८ जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. सर्व १९ जिल्ह्यात दूध संकलनाचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई, म्हशींचे शेतकरी पशुपालकांना वाटप करण्यात येणार आहे. पशु प्रजनन पूरक खाद्याचा पुरवठा, दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक खाद्यपूर्वकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी विशेष अनुदान वाटप, विद्युत चलित कडबाकुट्टी सयंत्रांचे वाटप, मुरघास वाटप तसेच आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील विकासकामासंदर्भात दिले पत्र
बीड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर करावयाच्या उपाययोजना तसेच विविध विकास कामांच्या संदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांनी या भेटीत केंद्रीय मंत्री गडकरी यांना मागण्यांचे पत्र सादर केले. या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान सावरगांव घाट येथे नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचा राष्ट्रसंत भगवान बाबा यांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर