रत्नागिरी : धनेश पक्षी पर्यटनाचा नवा मार्ग ठरू शकेल - गिरीजा देसाई
रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : कोकणातील निसर्गसंपन्नतेचा विचार करता धनेश पक्षी पर्यटनाचा नवा मार्ग ठरू शकेल, असा विश्वास विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी व्यक्त केला. वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहनिमित्त चिपळूणमध्ये आयोजित केलेले चर्च
चिपळूणधील वन सप्ताहातील चर्चासत्र


रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : कोकणातील निसर्गसंपन्नतेचा विचार करता धनेश पक्षी पर्यटनाचा नवा मार्ग ठरू शकेल, असा विश्वास विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी व्यक्त केला. वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहनिमित्त चिपळूणमध्ये आयोजित केलेले चर्चासत्र वन विभागाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, कोकणातील जैवविविधता आणि पर्यावरणीय वैभव पर्यटकांना आकर्षित करण्यास पुरेसे सक्षम आहे. अरुणाचल प्रदेशनंतर सर्वाधिक वृक्ष लागवडीखालील क्षेत्र असलेला रत्नागिरी जिल्हा आता केवळ निसर्गरक्षणापुरता मर्यादित न राहता पर्यावरणपूरक पर्यटनासाठीही महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही धनेश पक्ष्याच्या आठ प्रजाती आढळतात. हा पक्षी पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरू शकतो. ताडोबामध्ये वाघांसाठी जगभरातून पर्यटक येतात, तसाच धनेश पक्ष्याच्या माध्यमातून कोकणातील पक्षी व प्राणिवैभव पाहण्यासाठीदेखील जगभरातील अभ्यासक आणि पर्यटक येऊ शकतात. रत्नागिरी जिल्ह्यासाठी राजापूर व दापोली येथे वन्य प्राण्यांसाठी वन्यजीव उपचार केंद्र (ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर) स्थापन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शासकीय पातळीवर या केंद्रांसाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच ही सुविधा कार्यान्वित व्हावी, यासाठी वन विभाग पुढाकार घेत आहे, असेही त्या म्हणाल्या. खेड तालुक्यातील सातविन येथे एनआयसी सेंटर उभारण्यात येत असून येथे अत्याधुनिक पद्धतीने प्राण्यांची माहिती मिळणार आहे. जैतापूर येथे ‘मंगरुज’ या दुर्मिळ प्राण्यासाठी विशेष एनआयसी सेंटर सुरू होणार आहे. तसेच आरे-वारे आणि दापोली-मुरूड येथे इको-टुरिझम प्रकल्प उभारले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कोकणातील फक्त १.२१ टक्के जमीन वन विभागाच्या अखत्यारीत आहे. उर्वरित जागा खासगी मालकीची आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये अडचणी येतात.

उन्हाळ्यात पाण्याच्या अभावामुळे पक्षी आणि प्राण्यांचे जीव जातात. सीएसआर निधीच्या माध्यमातून खासगी जमिनीवरही अभ्यास करून पाणवठे उभारण्याची योजना आखली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वानरांच्या त्रासावर उपाय म्हणून हिमाचल प्रदेशहून दोन संशोधकांना बोलावून जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्याने तीन हजार ६०० वानरांचे पुनर्वसन करण्यात आले असून, यामध्ये एकाही वानराचा मृत्यू झाला नाही, हे विशेष यश आहे, असे त्या म्हणाल्या. सापांच्या बाबतीतसुद्धा जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सर्पमित्र साप पकडताना चुकीच्या पद्धती वापरतात, त्यामुळे सर्प जखमी होतात. सर्पमित्रांना प्रशिक्षण देणे व पकडलेल्या सर्पांची माहिती वन विभागाला देणे अनिवार्य करण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार वणवे लागतात. यातील ९० टक्के वणवे मानवनिर्मित असतात. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात १० गावांमध्ये वणवाप्रवण क्षेत्रात जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. देवराया जतन करणे हे आपले कर्तव्य असून, त्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी वनरक्षक प्रियांका लगड, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे रामशेठ रेडीज यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहानवाज शहा यांनी केले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. कोकणातील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करताना पर्यटनालाही चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करत, हा परिसर जागतिक नकाशावर उभा करण्याचा निर्धार या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande