लातूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। सन 2025-26 या वर्षात आंबिया बहारमध्ये आंबा, डाळिंब, केळी, पपई व द्राक्ष या पिकांसाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये लागू करण्यात आली आहे. ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. लातूर जिल्ह्यात ही योजना बजाज अलीयान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि पुणे या विमा कंपनी मार्फत कार्यान्वित केली जात आहे
लातूर , औसा, निलंगा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, देवणी या सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळासाठी आंबा फळपिकासाठी ही योजना लागू असून यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर, 2025 आहे. तर संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 8 हजार 500 रुपये इतका आहे.
डाळींब या पिकासाठी लातूर तालुक्यातील तांदूळजा, मुरुड, औसा तालुक्यातील औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकूंड, भादा, उजनी, निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद शहाजनी, रेणापूर तालुक्यातील कारेपूर व पानगाव, उदगीर तालुक्यातील नागलगाव, हेर, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, किनगाव व खंडाळी, चाकूर तालुक्यातील चाकूर, नळेगाव, वडवळ ना. या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 14 जानेवारी, 2026 पर्यंत आहे. विमा संरक्षित रक्कम 1 लाख 60 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 8 हजार रुपये इतका आहे.
केळी पिकासाठी औसा तालुक्यातील किल्लारी व मातोळा, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर, 2025 पर्यंत आहे. विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 8 हजार 500 रुपये इतका आहे. पपई पिकासाठी औसा तालुक्यातील उजनी, निलंगा तालुक्यातील निलंगा, उदगीर तालुक्यातील देवर्जन, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर, 2025 पर्यंत आहे. विमा संरक्षित रक्कम 40 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 2 हजार रुपये इतका आहे.
द्राक्ष पिकासाठी औसा तालुक्यातील औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकूंड, भादा, निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद शहाजनी, आंबुलगा, कासार बालकुंदा, उदगीर तालुक्यातील मोघा व देवर्जन, रेणापूर तालुक्यातील कारेपूर, चाकूर तालुक्यातील नळेगाव व शेळगाव या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर, 2025 पर्यंत आहे. विमा संरक्षित रक्कम 3 लाख 80 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 19 हजार रुपये इतका आहे.
योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis