सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। चांद्रयान, मंगळयान, आदित्य-1 आणि गगनयान मोहिमांद्वारे इस्रोने जागतिक पातळीवरील कामगिरी केली. कमी खर्चात उच्च तंत्रज्ञान वापरून भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन डॉ. व्यंकटेश यांनी व्यक्त केले.वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘वर्ल्ड स्पेस वीक’ च्या औचित्याने इस्रो प्रदर्शन व विविध विज्ञानस्पर्धांना प्रारंभ झाला. यावेळी डॉ. व्यंकटेश मार्गदर्शन करीत होते. या वेळी श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेचे विश्वस्त भूषण शहा, इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटेश, चिदंबर कुलकर्णी, सोलापूर सायन्स सेंटरचे प्रमुख डॉ. राहुल दास, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, आयटी विभाग प्रमुख डॉ. एम.एल.आर.जे. लोबो आणि समन्वयक डॉ. विपुल कोंडेकर उपस्थित होते.
वैज्ञानिक चिदंबर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी इस्रोकडून राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. निरीक्षण, प्रश्न विचारणे, प्रयोग करणे आणि समीक्षात्मक विचार वाढविण्याद्वारे विज्ञानाचे व्यावहारिक शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक तानाजी शिंदे यांनी साधेपणा, मेहनत आणि सातत्य या मूल्यांवर भर दिला. इस्त्रो प्रदर्शनास शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. शास्त्रीय माहिती घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड