रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील मनुज जिंदल यांची नियुक्ती झाली आहे.
राज्याच्या अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी आज (दि. ७ ऑक्टोबर) ही नियुक्ती जाहीर केली आहे. रत्नागिरीचे विद्यमान जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (मुंबई) सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.
२०१७च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी असलेले मनुज जिंदल सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी भामरागडमध्ये (जि. गडचिरोली) उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आणि परिवीक्षाधीन अधिकारी (पीओ) म्हणून, तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे गाझियाबादचे असून, वयाच्या १८व्या वर्षी त्यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) निवड झाली होती. यूपीएससी एनडीएमध्ये त्यांनी पूर्ण भारतात १८वा क्रमांक मिळवला होता. एनडीएच्या पहिल्या टर्ममध्ये ते टॉपर होते; मात्र नंतर त्यांना डिप्रेशन आल्यामुळे त्यांची कामगिरी चांगली झाली नाही आणि एनडीएतून त्यांना काढण्यात आले. नंतर त्यांनी व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीतून पदवी घेतली. परदेशात नोकरीही केली. २०१४मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. २०१७मध्ये तिसऱ्या प्रयत्नात ते आयएएस झाले. त्या वेळी त्यांनी देशात ५२वा क्रमांक मिळवला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी