नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:45 च्या सुमाराला नवी दिल्लीतील यशोभूमी, येथे आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या 9 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे (आयएमसी) 2025 उद्घाटन करणार आहेत.
दूरसंवाद विभाग आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर्स संघटनेने संयुक्तपणे इंडियन मोबाईल काँग्रेस 2025 हा उपक्रम आयोजित करणार आहे. परिवर्तन घडवण्यासाठी नवोन्मेष अशी या उपक्रमाची संकल्पना असणार आहे. येत्या 8 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत या उपक्रमाचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमाच्या माधअयमातून डिजिटल परिवर्तन आणि सामाजिक प्रगतीसाठी नवोन्मेषाचा उपयोग करून घेण्याबद्दलची भारताची वचनबद्धता अधोरेखित होणार आहे.
इंडियन मोबाईल काँग्रेस 2025 या उपक्रमातून दूरसंवाद आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील आधुनिक प्रगतीचे दर्शन घडेल. या उपक्रमाच्या निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित जागतिक आघाडीची व्यक्तिमत्वे, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील तज्ञ आणि नवोन्मेषकार एकाच ठिकाणी येणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत ऑप्टिकल कम्युनिकेशन्स, दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित सेमीकंडक्टर्स, क्वांटम कम्युनिकेशन्स, 6G आणि फसवणूकीच्या धोक्याचे संकेत या प्रमुख संकल्पनांवर भर दिला जाणार आहे. यातून भविष्यातील संपर्क जोडणी, डिजिटल सार्वभौमत्व, सायबर फसवणूकीला प्रतिबंध आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व याबाबतीतल्या भारताच्या धोरणात्मक प्राधान्यक्रमाचे दर्शन जगाला घडणार आहे.
या उपक्रमात 150 हून अधिक देशांतील 1.5 लाखापेक्षा जास्त प्रतिनिधी, 7,000 पेक्षा जास्त जागतिक प्रतिनिधी आणि 400 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमाअंतर्गत 100 पेक्षा जास्त सत्रे आयोजित केली जाणार असून, त्यात 800 पेक्षा जास्त वक्ते सहभागी होणार आहेत. या सत्रांमधून 5जी/6जी, कृत्रिम प्रज्ञा , स्मार्ट मोबिलिटी, सायबर सुरक्षा, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रातील 1,600 पेक्षा जास्त प्रत्यक्षात प्रयोग केलेल्या प्रकरणांचे सादरीकरण केले जाणार आहे.इंडियन मोबाईल काँग्रेस 2025 या उपक्रमाच्या आयोजनातून आंतरराष्ट्रीय सहकार्यावरही भर दिला जाणार आहे. याअनुषंगानेच या उपक्रमात जपान, कॅनडा, ब्रिटन, रशिया, आयर्लंड आणि ऑस्ट्रियामधील प्रतिनिधीमंडळे सहभागी होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule