नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर (हिं.स.)भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत लवकरच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतू शकतो. पंत ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंत इंग्लंड दौऱ्यादरम्यान जखमी झाला होता. उजव्या पायाला दुखापत असूनही तो दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आला होता. आणि यामुळे त्याची प्रकृती आणखी बिकट झाली होती. म्हणूनच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही.
पंतच्या उजव्या पायाची तपासणी या आठवड्यात बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथील वैद्यकीय पथक करणार आगे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर त्याला १० ऑक्टोबरपर्यंत खेळण्याची परवानगी मिळू शकते. पण त्याच्या फिटनेसविषयी बीसीसीआयची वैद्यकीय टीम कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
पंतने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांना कळवले आहे की, जर त्याला वैद्यकीय पथकाकडून फिटनेस क्लिअरन्स मिळाला तर तो २५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतने दिल्ली कॅम्पमध्ये सामील होण्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. तो सीओईकडून मंजुरीची वाट पाहत आहे. १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यात खेळणे थोडे कठीण वाटते. पण जर तो उपलब्ध असेल तर तो संघाचे नेतृत्व देखील करेल. भारत १४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळणार आहे. पंत ५ नोव्हेंबरपर्यंत दोन रणजी ट्रॉफी सामने खेळू शकतो. ज्यामुळे त्याला कसोटी मालिकेपूर्वी मैदानात परतण्याची संधी मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे