दुबई, 6 ऑक्टोबर (हिं.स.)भारताविरुद्ध महिला विश्वचषक सामन्यादरम्यान आचारसंहितेचे लेव्हल १ उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानची सलामीवीर फलंदाज सिद्रा अमीनला आयसीसीने फटकारले आहे. आणि तिला एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे.रविवारी आर. प्रेमदासा स्टेडियमवर अमीनने भारताविरुद्ध ८१ धावा केल्या होत्या. २४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिचा संघ १५९ धावांवरच गारद झाला. अमीनच्या संघर्षपूर्ण फलंदाजीनंतरही भारताने हा सामना ८८ धावांनी जिंकला.
आयसीसीने म्हटले आहे की, सिद्राला खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहे. हे उल्लंघन आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा खेळादरम्यान वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा अनादर करणे याच्याशी संबंधित आहे.
पाकिस्तानच्या धावांचा पाठलाग करताना ४० व्या षटकात स्नेह राणाने बाद केल्यानंतर तिने आपल्या बॅटने खेळपट्टीवर जोरदार प्रहार केला. तेव्हा ही घटना घडली. आयसीसीने म्हटले आहे की, त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. आणि २४ महिन्यांच्या कालावधीत हा तिचा पहिलाच गुन्हा होता. आयसीसीच्या मते अमीनने गुन्हा आणि आयसीसी मॅच रेफ्रीजच्या एमिरेट्स इंटरनॅशनल पॅनेलच्या सदस्य शांद्रा फ्रिट्झ यांनी सुचवलेला दंड मान्य केला आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे