मुंबई, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचा नाश, घरांचे नुकसान तसेच जमीन खरडून जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून आले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींची मदत जाहीर केली आहे. राज्यात ६८ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये २९ जिल्हे आणि २५३ तालुके सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले आहेत. जिथे पिकांचे नुकसान झाले तिथे अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, घरांची पडझड झाली, तिथे घरे उभारली जातील, ५० हजार रूपयांची मदत दुकानदारांना करणार आहेत. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जनावरांची अट रद्द केली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाईल. खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत. ज्या विहिरींमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून ३० हजार रूपये प्रति विहीर भरपाई दिले जाणार आहे. पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे १० हजार कोटी मदत केली जाणार आहे असं त्यांनी सांगितले.
खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७ हजार रुपये प्रतिहेक्टरी रोख आणि ३ लाख रुपये प्रतिहेक्टरी नरेगा योजनेअंतर्गत दिले जातील. बाधित विहिरींसाठी ३० हजार रुपये प्रतिविहीर दिले जातील. पायाभूत सुविधांच्या नुकसानीसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच ६१७५ कोटी रूपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहोत. बियाणे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल. कोरडवाहू शेतकऱ्यांना १८ हजार ५०० रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना २७ हजार प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० हेक्टर मदत दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना १७ हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने ३१ हजार ६२८ कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून दिले आहे. जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही तिघांनी बसून या पॅकेजवर चर्चा केली. शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट असल्याने इतर ठिकाणचे चार पैसे कमी केली तरी शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी सीएसआर फंड काही जण द्यायला तयार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले जातील. अजूनही काही मदतीची गरज असेल तिथे मदत करण्याची तयारी शासनाची आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कशी मिळणार मदत?
१. १ कोटी ४३ लाख ५२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर लागवड
२. त्यापैकी ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान
३. काही जमिनींवर अंशत: पण मोठ्या प्रमाणावर पूर्णत: नुकसान
४. साधारण २९ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान, २५३ तालुक्यांमध्ये सरसकट मदत होणार
५. ६५ मिलिमीटरची अट ठेवलेली नाही.
६. १०० टक्के घरं गेलेल्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत पूर्णपणे नवीन घर समजून पैसे दिले जातील.
७. अंशत: पडझड झालेल्या घरांनाही मदत
८. दुकानांचं नुकसान झालंय. ५० हजारांपर्यंतची मदत केली जाईल
९. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रुपयांपर्यंत प्रती जनावर मदत
१०. एनडीआरएफमधील तीन जनावरांची मर्यादा काढली आहे.
११. ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये प्रतिजनावर
१२. कोंबड्यांसाठी १०० रुपये प्रतिकोंबडी मदत दिली जाईल
१३. खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७ हजार रुपये हेक्टरी रोख आणि ३ लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून दिले जातील.
१४. बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून ३० हजार रुपये प्रतिविहीर दिले जातील.
१५. पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटींची तरतूद.
१६. दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. त्या जमीन महसुलात सूट, कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची वसुली, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा सर्व गोष्टी लागू केल्या आहेत.
१७. पीकनुकसान भरपाईसाठी ६५ लाख हेक्टर जमिनीसाठी ६१७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय
१८. रबीच्या पिकासाठी प्रतिहेक्टरी अतिरिक्त १० हजार रुपये दिले जातील.
१९. एकूणमध्ये कोरडवाहूसाठी हेक्टरी १८ हजार ५००, हंगामी बागायतीला २७ हजार तर बागायती शेतकऱ्याला ३२ हजार ५०० रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय
२०. ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला आहे. त्यांना वरील मदतीव्यतिरिक्त पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारण १७ हजार हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील.
२१. राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाईसाठी एकूण ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज दिलं जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule