शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
मुंबई,07 ऑक्टोबर (हिं.स.) : पूर आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांच्या मदतीचे भव्य पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणव
मदत पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई,07 ऑक्टोबर (हिं.स.) : पूर आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांच्या मदतीचे भव्य पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, शेतकरी पुन्हा उभा राहण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.

अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्हे आणि 253 तालुक्यांतील 68 लाख 69 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून याचा विचार करून सरकारने अटी शिथिल करत सरसकट मदतीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतदारांना 27 हजार, बागायती शेतकऱ्यांना 32 हजार 500 रुपये हेक्टरी आणि विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून 17 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे. त्यासोबतच पडझड झालेली घरे उभारण्यात येणार असून दुकानदारांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल. अतिवृष्टीमुळे ज्यांच्या गुरांचे नुकास झाले अशा शेतकऱ्यांना देखील मदत दिली जाणार आहे. यात दुधाळ जनावरांसाठी 37 हजार 500 रुपये (प्रति जनावर) दिले जातील. तसेच यासाठी 3 जनावरांची अट रद्द केली असून जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत मिळणार आहे.

शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत:-

कोरडवाहू शेतकरी: ₹18,500 प्रति हेक्टर

हंगामी बागायतदार: ₹27,000 प्रति हेक्टर

बागायती शेतकरी: ₹32,500 प्रति हेक्टर

विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना: ₹17,000 प्रति हेक्टर (विम्यातून)

जमीन आणि पायाभूत सुविधा:-

खरडून गेलेल्या जमिनीसाठी ₹47 हजार रोख आणि ₹3 लाख (नरेगाच्या माध्यमातून) प्रति हेक्टर

विहिरींना गाळ साचल्यास ₹30 हजार प्रति विहीर

पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ₹10 हजार कोटींची तरतूद

इतर मदतीचे प्रावधान:-

बियाणे व शेतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर

एकूण नुकसान भरपाईतून 6,175 कोटी शेतकऱ्यांना थेट मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांचे आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते. जेव्हा पीक करपते, पाण्याखाली जाते तेव्हा त्यांचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास फार मोठा असतो. त्याची 100 टक्के भरपाई शक्य नसली, तरी शेतकरी पुन्हा उभा राहावा यासाठी आम्ही हे पॅकेज आखले आहे.“शेतकऱ्यांवर आलेले संकट अभूतपूर्व आहे. म्हणून इतर ठिकाणचे चार पैसे कमी करून आम्ही शेतकऱ्यांसाठी ही मदत केली आहे. दिवाळीपूर्वी शक्य तितकी भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी, सीएसआर फंड व इतर स्रोतांद्वारे देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त मदतीची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण अडू नये, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande